पालघर : जिल्ह्यातील नागरिकांची मध्यरात्र पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली गेली. मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. धानीवरी, धुंदलवाडी, तलासरी यांसह परिसरातील गावांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले. अचानक घरं हादरू लागल्याने नागरिकांची झोप उडाली आणि अनेकजण भीतीपोटी घराबाहेर पडले.
पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. परिसरात वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे स्थानिक नागरिक आधीपासूनच चिंतेत आहेत. मध्यरात्री पुन्हा हादरे बसल्याने नागरिकांमधील भीती आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, या भागातील शेकडो घरांच्या भिंतींना यापूर्वीच तडे गेल्याची माहिती आहे. वारंवार बसणाऱ्या धक्क्यांमुळे घरांच्या भिंतींना तडे जाण्याची समस्या गंभीर बनत आहे.
मध्यरात्री सर्वजण गाढ झोपेत असताना अचानक जमिनीला हादरे बसू लागले. घरातील वस्तू हलू लागल्याने नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली. काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा पर्याय अनेकांनी निवडला.
पालघरच्या या भागात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने घरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून, आणखी हादरे बसल्यास घरांचे नुकसान वाढण्याची भीती स्थानिकांना सतावत आहे. त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












