‘मुरासू’ चक्रीवादळाचा तडाखा बसणार! ३ NDRF पथके तैनात, विमानांची उड्डाणे रद्द!

मुरासू चक्रीवादळ : चक्रीवादळाचे परिणाम किनारपट्टीच्या भागात आधीच जाणवत आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील मायापाडू बीचवर उंच लाटा आणि सोसाट्याचा वारा आदळत आहे.

मुरासू चक्रीवादळ: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मुरासू’ चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ आज (2 नोव्हेंबर) रात्री साडे अकरा ते 3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत ओंगोलेजवळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे. सोमवारी पहाटे साड पाच वाजता, हे चक्रीवादळ चेन्नईपासून 200 किलोमीटर आणि नेल्लोरपासून 210 किलोमीटर अंतरावर होते. ते ताशी 25 किलोमीटर वेगाने पुढे सरकत होते.

चेन्नईत मुसळधार पाऊस
चक्रीवादळाचे परिणाम किनारपट्टीच्या भागात आधीच जाणवत आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील मायापाडू बीचवर उंच लाटा आणि सोसाट्याचा वारा आदळत आहे. राज्यात एनडीआरएफची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. विजयवाडा विमानतळावरील दहा विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. रविवार रात्रीपासून तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. चेन्नईतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातील बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.


चक्रीवादळाच्या नावाचा अर्थ ‘युद्धाचा नगारा’
भारताने चक्रीवादळाला ‘मुरासू’ असे नाव दिले आहे. तमिळमध्ये ‘मुरासू’ म्हणजे ‘युद्धाचा नगारा’. मुरासू 1 नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात तयार झाले. 24 तासांच्या आत, त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले. एका आठवड्याच्या आत बंगालच्या उपसागरात देशाला धडकलेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी 28 ऑक्टोबर रोजी ‘अर्णब’ चक्रीवादळ आले होते. या काळात सलग दोन चक्रीवादळे तयार झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातील आणि आसपासच्या किनारपट्टी भागातील हवामानावर परिणाम झाला आहे.

चक्रीवादळाचा परिणाम लक्षात घेता, प्रशासनाने ओडिशाच्या रायगडा जिल्ह्यातील सर्व 11 अग्निशमन केंद्रांमधून पथके तैनात केली आहेत. राष्ट्रीय महामार्ग 326 वरील गुम्मा व्हॅली आणि मुकुंदपूर व्हॅलीमधील रस्ते बंद करण्याच्या कामासाठी, तसेच गरज पडल्यास रस्त्यावरील ढिगारा हटवण्यासाठी जेसीबी, एक्स्कॅव्हेटर आणि हायड्रा क्रेन सज्ज ठेवण्यात आले आहेत. रायगडासाठी 2 नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट आणि 3 ते 4 नोव्हेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात 2 आणि 3 नोव्हेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.