नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांचा धुमाकूळ! व्यापारी-ग्राहक हैराण; रुपेश पावसकर आक्रमक

कुडाळ : तालुक्यातील गाव मौजे नेरूर चव्हाटा येथील बाजारपेठेत माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे व्यापारी आणि ग्राहक त्रस्त झाले आहेत. या समस्येची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी वनविभागाला पत्र लिहून माकडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची विक्रीसाठी ठेवलेली फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ आणि इतर विक्रीच्या वस्तू माकडे राजरोसपणे उचलून नेत आहेत. माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना पळवून लावणे व्यावसायिकांसाठी अशक्य झाले आहे. एवढेच नव्हे तर, प्रवाशांच्या हातातील बँगही अचानक उचलून माकडे पळत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या सततच्या उपद्रवामुळे नेरूर चव्हाटा येथील व्यापारी आणि ग्राहकवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या प्रकरणी लक्ष घालून वनक्षेत्रपालांनी तात्काळ प्रतिबंधक कारवाई करावी आणि व्यापारी व ग्राहकांना माकडांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी विनंती जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.