
कुडाळ : कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ या प्रशालेतील विद्यार्थिनींनी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी ओरोस येथे आयोजित करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत प्रशालेच्या कु. मृदूला पंकज राऊळ व कु. निधी किशोर मार्गी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपले कौशल्य सिद्ध केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची विभागीय स्तरावरील कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. मुमताज शेख मॅडम यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व कौतुक केले. तसेच आगामी विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेतील सर्व शिक्षकवृंदांनीही विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या विद्यार्थिनींना प्रशालेचे शिक्षक श्री. प्राजक्त चव्हाण सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थिनींच्या या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.











