वेंगुर्ले : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जय हनुमान मित्रमंडळातर्फे ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता जुना स्टॅण्ड, बंदर रोड, वेंगुर्ले येथे नरकासुर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा युवा नेते विशाल परब यांनी पुरस्कृत केली आहे. या स्पर्धेतील मोठ्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १२ हजार आणि १० हजार, तर लहान गटातील प्रथम विजेत्यांना अनुक्रमे १० हजार, ८ हजार आणि ६ हजार अशी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत ट्रिकसीनयुक्त नरकासुर ग्राह्य धरले जाणार नाहीत. या स्पर्धेच्या ठिकाणी नरकासुर घेऊन येताना दाभोली नाकामार्गे घेऊन यावे आणि जाताना कलानगर शिरोडा नाकामार्गाने जावे. या स्पर्धेचे परीक्षण १० ते ११ या वेळेत होईल. रात्री १० नंतर येणारे नरकासुर स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. या स्पर्धेच्या ठिकाणी येताना शाळा नं. २ कडून डिजे बंद करणे अनिवार्य आहे. स्पर्धेचा निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येईल. तसेच ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० यावेळेत लहान मुलांचे विविध स्पर्धा फनी गेम्स व महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.












