एसटीच्या NCMC कार्ड सक्तीला मुदतवाढ! प्रवाशांना मोठा दिलासा; नियम झाले शिथिल

मुंबई : एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाच्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलतीचे तिकीट आता NCMC कार्डद्वारे दिले जात आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत अनेक अडचणी येत असल्यामुळे NCMC कार्ड सक्तीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवासासाठी महिलांना बंधनकारक करण्यात आलेल्या ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची (NCMC) सक्ती एसटी महामंडळाने शिथिल केली आहे. ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत एनसीएमसी कार्ड नसले तरी एसटीच्या सवलतीच्या महिलांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागात महिलांपर्यंत पुरेशी माहिती न पोहोचल्याने महामंडळाने हा दिलासादायक निर्णय घेतला.

१ जानेवारी २०२७ पासून NCMC कार्डची अट पुन्हा लागू

दिवाळीनिमित्त गावी किंवा देवदर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या सवलतीचा लाभ आता NCMC कार्डशिवाय घेता येणार आहे. एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची सक्ती ३१ डिसेंबरपर्यंत शिथिल केल्यामुळे आता NCMC कार्ड नोंदणी न झालेल्या पात्र प्रवाशांनाही सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. १ जानेवारी २०२७ पासून एसटी प्रवास सवलतीसाठी ‘एनसीएमसी’ कार्डची अट पुन्हा लागू राहणार आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवास सवलतीची नोंद ठेवण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचे म्हटले जात आहे.

NCMC कार्ड सक्तीमुळे ST बसचे उत्पन्न घटले

१ ऑक्टोबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या तिकिटासाठी NCMC कार्ड एसटी महामंडळाने अनिवार्य केले होते. कार्ड नोंदणी, सक्रिय करणे आणि वापरातील अडचणींमुळे महिला प्रवाशांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी होत्या. सप्टेंबरमध्ये एसटीला दररोज सरासरी ३३ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न २८ कोटी रुपयांपर्यंत घसरले. दैनंदिन उत्पन्नात पाच कोटी रुपयांची घट झाली. सप्टेंबर २०२४ मध्ये महामंडळाचा तोटा मागील वर्षाच्या तुलनेत ३६ कोटी ३३ लाख रुपयांनी वाढला. या घसरणीमागे एनसीएमसी कार्डची सक्ती हेच कारण असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले, तरी कार्डच्या अंमलबजावणीतील अडचणींचा मुद्दा चर्चेत आला होता.

माहितीअभावी ग्रामीण भागात अद्याप नोंदणी नाही

ग्रामीण भागातील अनेक महिलांनी माहितीअभावी अद्याप नोंदणी केलेली नाही. राज्यातील महिलांना एनसीएमसी कार्डची नोंदणी करणे आणि कार्ड वितरण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे राबवावी, यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग घ्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सप्टेंबरपर्यंत कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांपैकी ७१ टक्के प्रवाशांना कार्ड मिळाले आहे. यात अमृत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नोंदणी केलेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांपैकी ७८ टक्के जणांना कार्ड देण्यात आले आहे. महिलांमध्ये हे प्रमाण सर्वात कमी, म्हणजे ६९ टक्के आहे.

सुमारे १.१० कोटी एनसीएमसी कार्डाची नोंदणी

आतापर्यंत सुमारे १.१० कोटी एनसीएमसी कार्डाची नोंदणी आणि वितरण झाले आहे. महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या पाहता अनेक महिलांनी कार्ड काढलेले नाही. विशेषतः ग्रामीण भागात सुविधा व माहितीअभावी महिलांचे नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कार्डची सक्ती शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवासी, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व पात्र प्रवाशांची ३१ डिसेंबरपर्यंत १०० टक्के ‘एनसीएमसी’ नोंदणी करून कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकार विविध सामाजिक घटकांना एसटी तिकिटात सवलत देते. त्याची प्रतिपूर्ती सरकारकडून केली जाते. सवलतीत पारदर्शकता आणण्यासाठी पात्र प्रवाशांना ‘एनसीएमसी’ कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. मात्र कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना पूर्ण तिकीट काढून प्रवास करावा लागत होता. कार्ड अंमलबजावणीतील गोंधळाचा परिणाम महामंडळाच्या महसुलावरही झाला. त्यामुळे महिला लाभार्थ्यांसह पात्र प्रवाशांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत कार्डची अट शिथिल करण्यात आल्याचे आदेश महामंडळाकडून काढण्यात आले आहेत.