मालवणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री आठ बंगल्यांवर डल्ला; दोघे एलसीबीच्या ताब्यात

मालवण : मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांचे दरवाजे उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणान्या दोघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, दोन्ही संशयित मालवणमधीलच स्थानिक रहिवासी आहेत. सुशील यमावंत आळवे (वय २२. रा. देवली-गवाणवाडी, ता. मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (वय ४८, रा. धुरीवाडा, मालवण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांनीही घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मालवण-कट्टा येथील निसर्गनगरी संकुलात २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान ही घरफोडीची घटना घडली होती. चोरट्यांनी संकुलातील तब्बल आठ बंगल्यांना लक्ष्य केले होते. बंगल्यांच्या दरवाजांचे कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मौल्यवान मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. एकाच संकुलातील आठ बंगल्यांमध्ये झालेल्या या सामूहिक घरफोडीमुळे मालवण परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या घरफोडीप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ आणि ३३९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच संकुलातील आठ बंगल्यांमध्ये चोरी झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकान्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.
मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासातून संशयितांचा मागपोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली. त्यानुसार गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सुशील यशवंत आळवे आणि संतोष मधुसूदन पांगे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, आठ बंगल्यांमध्ये घरफोडी करणारे दोन्ही संशयित मालवणमधीलच असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी निसर्गनगरी संकुलातील बंगल्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर दोघांनाही पुढील तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हारुळ, हनुमंत भोसले सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा. आशिष जामदार, जॅक्सन गोन्साल्वीस, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल अमर कांडर आणि सायबर विभागाच्या महिला पोलीस शिपाई धनश्री परब यांचा समावेश होता.

निसर्गनगरी संकुलातील आठ बंगल्यांमध्ये झालेल्या घरफोडीचा उलगडा करण्यात एलसीबीला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मात्र, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अद्याप हस्तगत करायची असून, त्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.