सिंधुदुर्गच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उदय सामंत यांचा उद्योजकांशी संवाद; आमदार निलेश राणे यांची उपस्थिती!




ओरस, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासोबतच नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने आज ओरस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या संवाद कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औद्योगिक विकासाच्या विविध संधी, नवीन उद्योगांची उभारणी, गुंतवणुकीला चालना आणि स्थानिक उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यात नव्या उद्योगांची निर्मिती करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.
कोकणातील उपलब्ध संसाधने, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या संभाव्य संधींचा विचार करून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी कोणती पावले उचलता येतील, यावर यावेळी चर्चा झाली. उद्योजकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्यात आला.
या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, संजू परब यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, उद्योग विभागाचे अधिकारी आणि संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांची वाढ, गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि स्थानिक तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी झालेला हा उद्योजक संवाद कार्यक्रम जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला.












