कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या दरोड्याचे नियोजन करून आलेल्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. ओसरगाव-गवळवाडी येथून चोरीला गेलेली तब्बल ५७ लाख ४० हजार ९९५ रुपये किमतीची अॅल्युमिनियम लाइट केबल आणि चोरीत वापरलेले दोन ट्रक जप्त करत राजस्थान व हरियाणातील तीन आंतरराज्यीय चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुरुवारी (५ नोव्हेंबर) स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
ओसरगाव येथे ३ ते ४ नोव्हेंबरच्या दरम्यान केबलचे ५ मोठे बंडल चोरीला गेले होते. मालवण येथील व्यंकटरमना आशेन नायडू राकोटी यांच्या फिर्यादीवरून कणकवलीपोलिसांत गुन्हा दाखल होताच, पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले. सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सुरेश राठोड, राजेंद्र जामसंडेकर, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार आणि अमर कांडर यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी फत्ते केली.
तपासादरम्यान पोलिसांनी शिताफीने संशयित इरशाद खुर्शीद खान (वय ३२, रा. राजस्थान), आरिफ खुर्शीद खान (वय ३०, रा. हरियाणा) आणि शाहीद खुर्शीद खान (वय २४, रा. हरियाणा) या तिघा भावांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. या आंतरराज्यीय टोळीने रेकी करून हा चोरी केल्याचा संशय असून, त्यांच्या मुसक्या आवळल्याने महामार्गावरील मोठ्या चोऱ्यांचे रॅकेट उघडकीस आले आहे.
ताब्यात घेतलेल्या तिन्ही चोरट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या टोळीने जिल्ह्यात आणखी कुठे डल्ला मारला आहे का, याचा तपास पोलिस हवालदार पांडुरंग पांढरे करत आहेत.











