आंबोली घाटात दाणोली फाट्यावरून पुढे भलेमोठे झाड कोसळल्याने गोवा, सिंधुदुर्ग ते कोल्हापूर-बेळगाव महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्थानिक आणि वाहनधारकांकडून झाड हटवण्याचे काम सुरू.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग): गोवा आणि कोकणाला पश्चिम महाराष्ट्र तसेच कर्नाटकशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या अशा आंबोली घाटात आज पहाटेच्या सुमारास एक भलेमोठे झाड रस्त्यावर मधोमध कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर व बेळगावकडे जाणारी तसेच कोकणात येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यावर झाड आडवे आल्याने घाटात दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत
दाणोलीपासून ४ किमी अंतरावर दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली
सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जाताना दाणोलीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर हे मोठे झाड अचानक रस्त्यावर कोसळले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. झाड थेट रस्त्याच्या मधोमध उन्मळून पडले; मात्र सुदैवाने त्या क्षणी झाडाखाली कोणतेही वाहन नसल्याने मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी टळली आहे.
महामार्ग विभागाचे दुर्लक्ष; स्थानिक नागरिक अन् वाहनचालक सरसावले
आंबोली घाटाचा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येतो. पावसाळ्यात आणि संवेदनशील ऋतूंमध्ये अशा घाटांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ तास कर्मचारी व बचाव साहित्य तैनात असणे आवश्यक असते. मात्र, घटना घडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कर्मचारी वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अखेर अडकून पडलेले स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी स्वतः पुढाकार घेतला. नागरिकांनी कुन्हाडी व इतर उपकरणांच्या सहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. झाड हटवून एका बाजूने वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.












