सिंधुदुर्गची ‘शार्प शूटर’ रूपाली! राष्ट्रीय थलसेना फायरिंग स्पर्धेसाठी निवड

मालवण : मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागातील सीनियर अंडर
ऑफिसर रूपाली करंगुटकर हिने राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग यश संपादन केले आहे. दिल्ली येथे ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया थलसेना कॅम्प फायरिंग कॉम्पिटिशनसाठी तिची महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. या यशामुळे स. का. पाटील महाविद्यालय, कृ. सी. देसाई शिक्षण संस्था आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
गेल्या जून महिन्यापासून सुरू झालेल्या या खडतर निवड प्रक्रियेत राज्यभरातील सुमारे ३,५०० विद्यार्थ्यांमधून रूपालीची निवड झाली. तिने आतापर्यंत प्रत्येकी १० दिवसांची तब्बल ६ प्रशिक्षण शिबिरे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. प्रत्येक टप्प्यावर उत्कृष्ट कौशल्याची आणि शिस्तीची छाप पाडत तिने अंतिम संघात स्थान मिळवले.
रूपाली हिला कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राज आणि लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक यांचे विशेष सैनिकी प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांनी सुरुवातीच्या चाचण्यांपासून ते अंतिम तयारीपर्यंत तिच्या सरावावर विशेष लक्ष दिले.
रूपालीच्या या अभूतपूर्व यशाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य के. के. राबते आणि तहसीलदार गणेश लव्हे यांच्यासह शिक्षण, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.