भराडी देवीची यात्रा ; पाहा कधी भरणार आंगणेवाडीची जत्रा

सिंधुदुर्ग: तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवसाला पावणारी अशी आख्यायिका असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रेची तारीख निश्चित झाली आहे. बुधवारी सकाळी देवीचा हुकूम घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली असून दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या जत्रेला उपस्थिती राहतात. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर अशी खास ओळख असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीची जत्रा 9 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे. आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. आंगणेवाडीत येणारे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येतात.

वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहुन जिवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना केंद्रबिंदु मानून भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय न होता आई भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबिय आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असल्याचे श्री.आंगणे यांनी सांगितले. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दशर्वतात.

आंगणेवाडी जत्रेची तारीख निश्चित झाल्यानंतर रेल्वे तसेच खाजगी वाहनांच्या बुकिंग साठी चढाओढ लागली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून गेले काही दिवस यात्रेच्या तारीख निश्चितीबाबत अफवा पसरविल्या जात होत्या. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्षिय नेतेही या यात्रेसाठी उपस्थिती दर्शवीत असल्याने ग्रामस्थ मंडळाबरोबरच शासनाची सुद्धा या यात्रेच्या नियोजनासाठी एक प्रकारची कसोटी असते. जत्रेची तारीख आता जाहीर झाल्याने पूर्व तयारीस लवकरच प्रारंभ होणार आहे. दरवर्षी सुमारे 5 ते 7 लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. कोकणशाही सिंधुदुर्ग