मनीष दळवींनी माघार घेण्याचे कारण आले समोर ! ‘आडेली पॅटर्न’च्या मास्टरस्ट्रोकमुळे विरोधकच घायाळ । विशेष संपादकीय ।

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग

राजकारणात विजयासाठी नेहमी विरोधकांच्या पुढे जाण्यासाठी राजकारण खेळायचे असते.. पण कधीकधी एक पाऊल मागे घेण्यात पुढची दोन पावले विजय सुकर होतो हे वेळेच्या अगोदर कळायला मात्र फक्त राजकारण नव्हे तर तुम्हाला सिंधुदुर्गचे राजकारण समजायला हवे.. बिनविरोध शब्दाची चर्चा चालु असताना एका विनिंग सिटने घेतलेली माघार नेमकी का होती? ही समजायला आता आडेली पॅटर्नचा मास्टरस्ट्रोक हा समजून घ्यायला हवा.. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकणशाहीचे राजकीय नेटवर्क तितकेच स्ट्रॉंग असल्याने त्यांनी माघार घेण्याचे राजकीय कारण कोकणशाहीच्या हाती लागले आहे. निवडणूक – त्या निवडणुकांमधील घडामोड आणि कोकणशाही हे एक समीकरण आहे. कुठलीही घडामोड असली तरी त्या घडामोडीमागील बातमी सर्वप्रथम कोकणशाहीच्या स्क्रिन वर झळकत असते. त्यामुळेच मनीष दळवी यांनी माघार का घेतली या प्रश्नाचा मागोवा कोकणशाहीने घेतला असता राजकीय पटलावर जी चर्चा सुरु आहे तीच चर्चा आपण सर्वांशी शेअर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे सच्चा कार्यकर्ता या नात्याने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे काम करण्यासाठी आपण खासदार नारायण राणे यांच्या आदेश स्वीकारले असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले. वेंगुर्ले तालुक्यात आडेली जिल्हा परिषद मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदारसंघात एकूण दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मनीष दळवी यांच्या सह आप्पा गावडे, , विष्णू खानोलकर, ललित कुमारठाकूर, जनार्दन कुडाळकर, ओंकार नाईक व नित्यानंद शेणई यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. दरम्यान या ठिकाणी आता अपक्ष उमेदवार समिधा नाईक, उबाठा चे विजय नाईक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सखाराम उर्फ दादा सारंग यांच्यात लढत होणार आहे.

सिंधुदुर्गची प्रत्येक निवडणूक ही कोकणशाहीच्या शब्दात जशी सांगितली जाते तशीच ती निकालच्या गुलालात उधळते आणि म्हणूनच आम्ही सांगतोय सगळ्यात मोठा सिंधुदुर्गच्या राजकारणातला धक्कादायक मास्टरस्ट्रोक आहोत हे अभिमानाने सांगतो. आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप उमेदवार मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची घटना पहिल्या नजरेला धक्कादायक वाटत असली, तरी खोलात पाहिल्यास हा निर्णय म्हणजे भारतीय जनता पक्षाचा अचूक वेळ साधलेला मास्टरस्ट्रोक ठरतो. राजकारणात माघार ही नेहमीच पराभवाची खूण असते, असा समज या निर्णयाने पूर्णपणे फोल ठरवला आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या रणनितीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अत्यंत सखोल, विधानसभा निहाय मतदानाची गणिते मांडली गेली आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा इतिहास, मतांचे विभाजन, गट-तट, भावनिक मुद्दे आणि संभाव्य ध्रुवीकरण या सगळ्याचा बारकाईने अभ्यास करूनच भाजपाने आडेलीचा डाव आखल्याचे स्पष्ट दिसते.

मागील विधानसभा निवडणुकीत याच पट्ट्यात अपक्ष उमेदवार विशाल परब यांना २६०० मते, तर शिवसेना (उबाठा) उमेदवाराला २३०० मते मिळाली होती. म्हणजेच मतदारसंघ आधीच तुकड्यात विभागलेला होता. उबाठा गटाकडून पुन्हा एकदा विधानसभा निहाय मतांना भावनिक राजकारणाची किनार देत समीकरणे आपल्या बाजूने वळवण्याचा जुगार खेळला जात असल्याची चर्चा होती. तसेच उबाठा सेनेकडून कडून अपक्षा उमेदवारांना देखील साथ दिली जाण्याची शक्यता दाट होती. मात्र खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वात भाजपाने फासे उलटे टाकत हा डाव निष्प्रभ केला. मनीष दळवी यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेला आर्थिक आणि प्रशासकीय उंचीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेसाठी मनीष दळवी हे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासकामांचा आश्वासक चेहरा म्हणून पुढे येत होते. त्यांची उमेदवारी ही उबाठा गटासह सर्व विरोधकांसाठी डोकेदुखी ठरणार होती, हे निर्विवाद. मात्र विरोधकांची रणनिती ओळखण्यात माहीर असलेल्या नितेश राणे व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी इथेच संपूर्ण खेळ फिरवला अशी चर्चा सुरु आहे. ही माघार कमकुवतपणाची नाही, तर भाजप पुरस्कृत अपक्षाचा विजय सुकर करण्यासाठी केलेली रणनीतिक माघार आहे. म्हणजेच एक चेहरा मागे घेतला, पण संपूर्ण मतदारसंघातील सत्ता-समीकरण आपल्या बाजूने झुकवले.

आज या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे आणि भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय हा भावनेपेक्षा गणितावर आधारित घेतला जातोय, हे आडेली प्रकरणातून ठळकपणे समोर आले आहे. एकंदरीत, मनीष दळवी यांची ही माघार नसून राजकीय शह–काटशहाचा भाग आहे. उमेदवारी नव्हे, तर ती उमेदवारीच विरोधकांना घेरणारी ठरली होती आणि आता हे गणित इतकं गुंतागुंतीचं झालं आहे की, विरोधकांसह अनेक राजकीय निरीक्षकही चक्रावून गेले आहेत. आडेलीचा हा डाव भविष्यात सिंधुदुर्गच्या राजकारणात “केस स्टडी” म्हणून ओळखला जाईल, यात शंका नाही. आणि आडेली जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून येणार उमेदवार हा महायुतीच्याच विशाल गोटातील असेल यात शंका नाही.