महिला व्यावसायिकांसाठी रोजगार व शासकीय योजनांवर मार्गदर्शन शिबिर; २३ जुलै रोजी कणकवलीत आयोजन

संजय पेटकर | कणकवली

कणकवली तालुका व्यापारी संघाशी संलग्न महिला व्यावसायिक संघटना, कणकवलीची नुकतीच स्थापना करण्यात आली असून, महिला उद्योजिका आणि व्यावसायिकांना व्यवसायात अधिक सक्षमपणे कार्य करता यावे तसेच आधुनिक व्यावसायिक आव्हाने, संधी आणि शासकीय योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांच्या पहिल्या टप्प्यात गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी ‘रोजगार मार्गदर्शन व शासकीय योजनांची माहिती’ या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात सायंकाळी ४.०० ते ७.०० या वेळेत होणार असून, कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माननीय सौ. गौरी पाटील-जोशी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.

या शिबिरात जिल्हा उद्योग केंद्र, सिंधुदुर्गच्या जिल्हा उद्योग निरीक्षक मा. कोमल माने, शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक मा. प्रकाश दळवी तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक मा. स्नेहल पुजारे हे विविध शासकीय योजना, उद्योग-व्यवसायाच्या संधी आणि स्वयंरोजगाराच्या मार्गांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, कणकवलीच्या शाखाधिकारी मा. सौ. उमा नांदोस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

महिला उद्योजिका, व्यावसायिक तसेच रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात संधी शोधणाऱ्या सर्व इच्छुकांनी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित राहून उपलब्ध शासकीय योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर यांनी केले आहे.