संपादक सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे मागे घ्या- अखिल भारतीय संपादक डिजिटल मिडीया संघटनेचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : संपादक सागर चव्हाण यांच्यावर महावितरण विभागाकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे हे पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा आणि सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप करत डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सिंधुदुर्ग आता आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय संपादक डिजिटल मिडीया संघटनेच्या वतीने ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आले.
संघटनेने या प्रकरणाकडे केवळ एका पत्रकारावरील कारवाई म्हणून न पाहता, पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला थेट आघात म्हणून पाहिले आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका बजावत असताना जनतेचे प्रश्न, प्रशासनातील त्रुटी आणि विविध गैरप्रकार समोर आणणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल होणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची तसेच पत्रकार सागर चव्हाण यांच्यावरील गुन्हे तातडीने मागे घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.संघटनेने स्पष्ट इशारा दिला आहे की, पत्रकारांवर अन्यायकारक पद्धतीने कारवाई करण्याचे प्रकार यापुढे सहन केले जाणार नाहीत. पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असेल ते सर्व लोकशाही मार्गाने आंदोलन उभारले जाईल. सत्य मांडणाऱ्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नसल्याची ठाम भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे.
यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोकण संघटक राजेश नाईक,विनायक गावस,चिन्मय घोगळे,निलेश ओरोसकर,वैष्णवी ओरोसकर यासह जिल्ह्यातील सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सर्व पत्रकारांनी एकजुटीने लढा देण्याचा निश्चित यावेळी करण्यात आला.