कुडाळ : कुडाळ शहरातील नागरिकांसाठी शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. एसटी प्रवाशांसाठी वार्षिक सवलत कार्ड शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने रविवारी, १९ जुलै २०२६ रोजी एसटी वार्षिक सवलत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अवघ्या १५० रुपयांत २०० रुपयांचे एसटी वार्षिक सवलत कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डधारकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेमी-लक्झरी एसटी बसमध्ये १८ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासावर १० टक्के भाडे सवलत मिळणार आहे. तसेच, कार्डधारकाचा एसटी अपघातात मृत्यू झाल्यास अतिरिक्त अपघाती विमा संरक्षणाचा लाभही मिळणार असून, त्यासाठी महामंडळाच्या अटी लागू राहतील.
याशिवाय, वार्षिक कार्ड असल्यामुळे प्रत्येक वेळी तिकीट सवलतीसाठी स्वतंत्र प्रक्रिया करण्याची गरज भासणार नाही. या शिबिरात रोख रक्कम काढणे, बिल पेमेंट, आधार सेवा, हॉटेल व एअर बुकिंग, मनी ट्रान्सफर, ई-चलान, फास्टॅग, इन्शुरन्स आणि लोन पेमेंट यांसारख्या विविध सेवा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत महायुती कार्यालय, सिंधुदुर्ग राजा मैदानाजवळ, कुडाळ येथे होणार आहे. या विशेष शिबिराचा लाभ घेण्यासाठी कुडाळ शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.












