नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठा बदल

आ. निलेश राणे यांच्याकडून उबाठा सेनेला धक्का देत 150 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश |

नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून उबाठा सेनेला मोठा धक्का बसला आहे. सायचे टेंब (नेरूर) येथील उबाठा सेनेचे सुमारे १५० कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाने आणि कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, “तुम्ही ज्या विश्वासाने शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तुम्हाला अपेक्षित असलेला विकास महायुतीच्या माध्यमातून नक्कीच करून दाखवू.”

सायचे टेंब येथे झालेल्या या पक्षप्रवेशामुळे उबाठा सेनेला मोठे खिंडार पडले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी महापौर दत्ता दळवी, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, निवडणूक प्रमुख देवेंद्र नाईक, उमेदवार संजय पडते, पंचायत समिती उमेदवार नीता नाईक, ममता देसाई, जिल्हा बँक संचालक नीता राणे, तसेच नेरूर, वालावल परिसरातील अनेक सरपंच, उपसरपंच व माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार निलेश राणे पुढे म्हणाले की, “आपल्या गावाचा खरा विकास महायुतीच्या माध्यमातूनच होऊ शकतो. याआधीच्या आमदारांनी हा भाग विकासापासून वंचित ठेवला. तुम्ही आता खऱ्या शिवसेनेत आला आहात. येथे प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य तो सन्मान आणि निधी मिळेल. शिवसेना हा फक्त पक्ष नसून कुटुंब आहे.”

यावेळी त्यांनी उमेदवार संजय पडते यांच्या अनुभवाचा उल्लेख करत मतदारांना आवाहन केले की, “समोरचा उमेदवार कोण आहे यापेक्षा आपला उमेदवार किती सक्षम आहे हे पाहा. जिल्हा परिषदेत अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या संजय पडते यांना मतदान करून आपल्या भागाच्या विकासासाठी साथ द्या. विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे.”

या घडामोडीमुळे नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीची ताकद वाढली असून निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय तापमान अधिक चढले आहे.