आ. निलेश राणे यांच्यावर नेरूरवासियांचा विश्वास वाढता वाढता वाढे
साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग – कोकणशाही
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात गुरुवारी मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. उबाठा शिवसेनेत तीव्र अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असून, पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वा. आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत नेरूर जिल्हा परिषद मतदार संघात दाखल होत आहेत.
महायुतीच्या उमेदवारांना वाढता प्रतिसाद
नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय पडते तसेच पंचायत समितीचे उमेदवार यांना स्थानिक नागरिकांकडून वाढता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी होणाऱ्या प्रचार सभा, बैठका आणि भेटीगाठींमधून महायुतीच्या बाजूने वातावरण झुकत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
आ. निलेश राणेंवर नेरूरवासियांचा ठाम विश्वास
या संपूर्ण राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आमदार निलेश राणे आहेत. नेरूर परिसरातील विकासकामे, सातत्यपूर्ण संपर्क आणि स्पष्ट भूमिका यामुळे नेरूरवासियांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे. हाच विश्वास महायुतीच्या उमेदवारांना ताकद देत असल्याचं बोललं जात आहे.
कवठीमध्ये उबाठा गटाला मोठा धक्का
दरम्यान, कवठी गावात उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कवठी ग्रामपंचायतीचे सदस्य भूषण बाबू बांदेकर यांनी उबाठा शिवसेनेला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला.
हा प्रवेश शिवसेना उपतालुका प्रचार प्रमुख व उपतालुका प्रमुख देवेंद्र नाईक यांच्या हस्ते पार पडला. या वेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद नाईक, वालावल सरपंच राजा प्रभू, उपविभागीय अध्यक्ष मनिष वाड्येकर, शाखाप्रमुख शेखर मेस्त्री तसेच मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा ओघ वाढतोय
भूषण बांदेकर यांच्या प्रवेशामुळे कवठी आणि परिसरात उबाठा शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. यामुळे इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारीही महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, येत्या काही तासांत आणखी प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेरूरमधील लढतीचं चित्र बदललं
या घडामोडींमुळे नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलत चाललं आहे. एकीकडे महायुतीला वाढता पाठिंबा मिळत असताना, दुसरीकडे उबाठा शिवसेनेतील गळती थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे.
नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात गुरुवार हा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता असून, राजकीय भूकंप घडण्याची दाट चिन्हे आहेत. महायुतीची ताकद वाढत असताना, उबाठा शिवसेनेसमोरील संघटनात्मक आव्हान अधिक तीव्र होत चाललं आहे. येणाऱ्या घडामोडींमुळे नेरूरच्या राजकारणाला नवं वळण मिळणार, हे मात्र निश्चित.











