नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक यावेळी चांगलीच रंगात आली आहे. महायुतीकडून संजय पडते तर ग्राम विकास पॅनलतर्फे अपक्ष म्हणून रुपेश पावसकर रिंगणात उतरले आहेत. ही लढत केवळ दोन उमेदवारांमधील नसून, दोन राजकीय विचारधारांमधील थेट संघर्ष म्हणून पाहिली जात आहे.
संजय पडते यांना आमदार निलेश राणे यांची ठाम आणि उघड पाठिंबा मिळतो आहे. त्यामुळे महायुतीचं संघटनबळ, कार्यकर्त्यांची फळी आणि प्रचारयंत्रणा पडते यांच्या बाजूने भक्कम उभी राहिली आहे. पडते स्थानिक नाहीत, असा नेरेटिव्ह काही दिवसांपासून पसरवला जात होता. मात्र, “मी स्थानिकच आहे आणि जनतेच्या सेवेत कायम आहे,” असं ठासून सांगत पडते यांनी त्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. विकास, संपर्क आणि सत्तेच्या माध्यमातून कामं मार्गी लावण्याचं आश्वासन हे पडते यांचं प्रमुख बलस्थान मानले जातेय.
दुसरीकडे, रुपेश पावसकर यांना उबाठा सेनेचा पाठिंबा मिळाल्याने विरोधकांचं ध्रुवीकरण त्यांच्या बाजूने होताना दिसत आहे. “स्थानिक प्रश्न, स्थानिक नेतृत्व” हा मुद्दा पुढे करत पावसकर यांनी प्रचाराची दिशा ठरवली आहे. काही भागांमध्ये पावसकर समर्थक आक्रमक आणि पुढाकार घेताना दिसत असून, सत्तेविरोधातील नाराजी त्यांना पूरक ठरते आहे.
संपूर्ण मतदारसंघात चित्र मिश्र आहे. काही गावांमध्ये पडते यांना स्पष्ट आघाडी दिसते, तर काही पट्ट्यांमध्ये पावसकर यांची पकड मजबूत आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची बनली आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान, स्थानिक समीकरणं, आणि “कोण मतदानाला बाहेर पडतो” हे घटक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
नेरूरमध्ये ही लढत सत्तेच्या ताकदीविरुद्ध स्थानिक मुद्द्यांची आहे, असं म्हणावं लागेल. महायुतीचा संघटनात्मक जोर संजय पडते यांना फायदा देऊ शकतो, तर असंतोषाची लाट आणि विरोधकांची एकजूट रुपेश पावसकर यांना बळ देऊ शकते.
९ फेब्रुवारीला मतपेटीत बंद झालेला कौल कुणाच्या पारड्यात पडतो, हे निकालाच्याच दिवशी स्पष्ट होईल. तोपर्यंत नेरूरची राजकीय नाडी ताणलेलीच आहे.
साईनाथ गांवकर – कोकणशाही – नेरूर












