डॉ.तन्मय आठवले यांना दुबईतील ग्लोबल नी समिटसाठी मानाचा आंतरराष्ट्रीय सन्मान

देवगडचे वैद्यकीय प्रतिनिधित्व जागतिक मंचावर

देवगड : देवगड मेडिकल फाउंडेशनचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना संयुक्त अरब एमिरेट्स मधील दुबई येथे आयोजित करण्यात आलेल्या जगप्रसिद्ध “ग्लोबल नी समिट” या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले. जगभरातील गुडघा शस्त्रक्रिया व अस्थिरोग क्षेत्रातील सर्वोच्च तज्ज्ञ डॉक्टरांची ही परिषद जागतिक वैद्यकीय क्षेत्रातील एक ऐतिहासिक व प्रतिष्ठित मंच म्हणून ओळखली जाते.
या भव्य परिषदेला जगातील विविध देशांमधून ३००० हून अधिक नामांकित अस्थिरोग तज्ञांनी सहभाग घेतला. भारताच्या प्रतिनिधीमंडळात डॉ. तन्मय आठवले यांची विशेष निवड होणे ही केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर देवगड, सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब ठरली आहे.
परिषदेदरम्यान डॉ. आठवले यांनी एमिरेट्स ऑर्थोपेडिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अली अल बेलूशी, प्लांचर ऑर्थोपेडिक्स अँड स्पोर्ट्स मेडिसिनचे क्लिनिकल प्रोफेसर डॉ. केविन प्लांचर यांच्यासह जगभरातील अनेक नामवंत अस्थिरोग तज्ज्ञांशी सखोल संवाद साधला. तसेच भारतातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ आणि संचेती ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ. पराग संचेती यांच्यासोबत विशेष “चॅट शो” सत्रात त्यांनी सहभाग घेतला.
डॉ. तन्मय आठवले यांची दुबई पर्यटन विभागाच्या प्रतिष्ठित “व्हिजिट दुबई प्रोग्राम” अंतर्गत भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. परिषदेदरम्यान त्यांनी संयुक्त अरब अमिरातीतील नामांकित रुग्णालयांना भेट देऊन तेथील अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या उपचार पद्धतींचा अभ्यास केला.
या आंतरराष्ट्रीय मंचाचा लाभ घेत डॉ. आठवले यांनी अनेक जागतिक अस्थिरोग तज्ज्ञांना भारत आणि विशेषतः देवगडला भेट देण्याचे निमंत्रण दिले. भारतीय वैद्यकीय परंपरा, आधुनिक उपचार सुविधा आणि भारतीय आतिथ्याचा अनुभव घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
डॉ. तन्मय आठवले यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, ही प्रतिष्ठित निवड त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील आणखी एक सुवर्णक्षण ठरली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रुग्ण, सहकारी डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि शुभेच्छुकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देवगड मेडिकल फाउंडेशनसाठी तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण असून, डॉ. तन्मय आठवले यांच्या जागतिक स्तरावरील सहभागामुळे देवगडच्या वैद्यकीय सेवेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळत आहे. कोकणशाही देवगड