पावशी जि. प. मतदारसंघात दादा साईल विरुद्ध अमरसेन सावंत । सत्ताधारी ताकदीचे पारडे जड

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक यावेळी अत्यंत लक्षवेधी ठरली आहे. महायुतीकडून तुकाराम उर्फ दादा साईल रिंगणात असून, त्यांच्या विरोधात उबाठा सेनेचे अमरसेन सावंत हे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. ही लढत केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता, सत्ताधारी विकासवादी राजकारण आणि विरोधकांच्या दिशाहीन भूमिकेतील संघर्ष म्हणून पाहिली जात आहे.

मालवण अन कुडाळ तालुक्यासहित सिंधुदुर्गात उबाठा सेनेला मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांच्या आउटगोइंगचा फटका बसला आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याने संघटनात्मक बांधणी कमकुवत झाली आहे. त्यातच ठोस विकास धोरणाचा अभाव आणि भविष्याचा स्पष्ट आराखडा न मांडता आल्याने उबाठा सेनेची विश्वासार्हता प्रश्नांकित होत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येते. दादा साईल हे सत्ताधारी महायुतीचे उमेदवार असल्याने त्यांना संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि प्रशासनाशी समन्वयाचा फायदा मिळतो आहे. याच कारणामुळे पावशी मतदारसंघात स्थानिक नागरिकांचा ओघ दादा साईल यांच्याकडे वाढताना ग्राउंडवर स्पष्टपणे जाणवत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादा साईल यांना बदनाम करण्याचे शडयंत्र रचले जात असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या आरोपांचा मतदारांवर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. उलट, “दादा साईल आमच्यातले आहेत” अशी भावना अनेक गावांमध्ये व्यक्त होत असून, स्थानिक जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे बोलले जात आहे.

एकूणच पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात सध्याचे राजकीय चित्र पाहता, सत्ताधारी पक्षाची ताकद, स्थानिकांचा वाढता पाठिंबा आणि संघटनात्मक मजबुती यामुळे तुकाराम उर्फ दादा साईल यांचे पारडे जड असल्याचे संकेत मिळत आहेत. तरीही अंतिम कौल मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल, पण सध्या तरी पावशीमध्ये दादा साईल यांची आघाडी चर्चेचा विषय ठरत आहे.

साईनाथ गावकर – कोकणशाही – पावशी