मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषदेकडील रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती, खड्डे भरणे आणि रस्त्यांची सद्यस्थिती याबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन आढावा घेतला.
जिल्ह्यातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दर्जेदार पद्धतीने दुरुस्ती व मजबुतीकरण करावे. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने जिल्ह्यात चाकरमानी येतात. त्यांच्या प्रवासात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची नियमित देखभाल व आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करा, तसेच जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करावीत आणि त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने कराव्यात, असेही निर्देश यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत (VC द्वारे), सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.












