देवगड : १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चक्रीवादळाच्या रंगीत तालीम मोहिमेसाठी नागपूरहून सिंधुदुर्गात आलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाच्या वाहनावरच कुणकेश्वर येथे बुधवारी सायंकाळी ‘आपत्ती’ ओढवली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पर्यटकांच्या कारला धडक दिल्यानंतर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला. वाहनाची दोन्ही चाके २५ ते ३० फूट उंच डोंगरकड्यावरून खाली घसरली. मात्र, डिझेल टँक मोठ्या खडकाला अडकल्याने वाहन दरीत कोसळण्यापासून बचावले आणि मोठा अनर्थ टळला.
चक्रीवादळाच्या रंगीत तालीम मोहिमेच्या प्रशिक्षणासाठी नागपूरहून आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी सिंधुदुर्गात तांबळडेग येथे आली होती. गुरुवारी रंगीत तालीम असल्याने बुधवारी सायंकाळी या पथकाचा मुक्काम कुणकेश्वर येथील भक्तनिवासात करण्यात आला होता. प्रशासनाच्या वतीने त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती.
आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य घेऊन आलेले वाहन (क्र. MH 31 FC 1272) कुणकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस पार्किंग करत होते. वाहन रिव्हर्स घेत असताना तेथे पार्क केलेल्या पर्यटकांच्या रेनॉल्ट किगर कारला (क्र. MH 45 AQ 9330) बंपरची धडक बसली. त्यानंतर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन डोंगरकड्याच्या दिशेने सरकले.
वाहनाची दोन्ही चाके कड्यावरून खाली गेली. मात्र, वाहनाचा डिझेल टँक मोठ्या खडकाला अडकल्याने वाहन पुढे दरीत कोसळले नाही. वाहनामध्ये चालकासह आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य होते. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान घडला.
दरम्यान, सांगोला-महिम येथील उमेश दादासी राऊत हे आपल्या मित्राची कार घेऊन कोकण पर्यटनासाठी आले होते. गणपतीपुळे येथील पर्यटनानंतर ते कुणकेश्वर येथे आले. कार पार्क करून ते कुणकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले असताना आपत्ती व्यवस्थापनाच्या वाहनाची त्यांच्या कारला धडक बसली. या धडकेत कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाच्या विविध यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या साहाय्याने कड्यावर अडकलेले आपत्ती व्यवस्थापनाचे वाहन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चक्रीवादळाची रंगीत तालीम करण्यासाठी आलेल्या पथकाच्या वाहनावरच अपघाताची वेळ आल्याने ‘आपत्ती व्यवस्थापनाच्या गाडीवरच आपत्ती’ अशी चर्चा घटनास्थळी रंगली होती.











