सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेने बीएसएनएल बरोबर करार पूर्ण केला असून कोंडुरे येथे नव्याने मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे लवकरच मोबाईल सेवा सुरू होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत मुळेवाड कार्यक्षेत्रात कोंडुरे हा महसूल विभाग वेगळा असून या गावात मोबाईल टॉवर नसल्याने या ठिकाणच्या मोबाईल ग्राहकांची फार मोठी गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन या ठिकाणी ग्रामपंचायत मालकीची असलेली जमीन बीएसएनएल टॉवर उभारण्यासाठी देण्याचे एकमुखी ठराव ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये घेऊन बीएसएनएल कंपनी बरोबर सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी पुढाकार घेऊन टॉवर बाबतचा करार पूर्ण केला.यानंतर आता टॉवर उभारणी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून लवकरच कोंडुरे वासियांकरिता मोबाईल टॉवरची सेवा सुरू होणार आहे. याकरिता कोंडुरे ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. मोबाईल टॉवर चे काम सुरू झाल्याने या भागातील मोबाईल ग्राहकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.










