खासगी शाळांना टक्कर! ग्रामीण जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम

रत्नागिरी : अगदी नर्सरीपासून ते सातवीपर्यंत अनेक शैक्षणिक सुविधा, अद्ययावत डिजीटल ऑनलाइन स्क्रीन, संगणक आदी आधुनिक पद्धतीचे ऑनलाइन शिक्षण सुविधा हजारो किंवा लाखो रुपयांची फी मोजल्यावर विद्यार्थ्यांना मिळतात. यामध्ये काही नवल नाही. पण राज्यातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिक्षण मिळाल्यास तो नक्कीच कौतुकाचा विषय आहे. प्राथमिक शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढवा, शिक्षणाची गोडी लागावी यासाठी अत्याधुनिक डिजीटल क्लासरूम काही प्राथमिक शाळांना पुरवण्यात आले आहेत. यामध्ये कोकणातील काही शाळांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील हर्णे उर्दू व गिम्हवणे येथील जिल्हा परिषदेच्या आदर्श केंद्र शाळेचाही समावेश आहे. पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत डिजीटल क्लासरूम असलेले ‘आयडियल सेंटर’ विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा आणि नाविन्यपूर्ण विषय ठरला आहे.
अद्ययावत डिजिटल क्लासरूममध्ये इंटरनेट, वायफाय सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्राथमिक शाळेतही अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळू लागलं आहे. या डिजीटल क्लासरूमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही प्रेमात पडले आहे. या क्लासरूममध्ये बसून अध्ययन करण्यासाठी चिमुकले विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या आवडीने बसून अध्ययन करू लागली आहेत.
मराठी, विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल असे शैक्षणिक विषय या क्लासरूममधून सोप्या अॅनिमेशनचा उपयोग करून शिकवले जातात. त्यामुळे शासनाच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांचा ओढा वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना, बौद्धिक कौशल्याला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
गिम्हवणे आदर्श केंद्र शाळेत 24 संगणक, अद्ययावत इंटर ऍक्टिव्ह बोर्ड, खास लुक असलेले विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चेअर व बेंचस असा छान लुक या क्लासरूमचा आहे. विद्यार्थी व पालकांच्या व ग्रामस्थांच्याही कौतुकाचा विषय ठरला आहे. ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक, सरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष व गावचे अध्यक्ष यांच्याकडूनही या डिजीटल क्लासरूमचे भेट देऊन कौतुक करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये हा विषय कुतूहलाचा ठरला आहे. या क्लासरूममध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला हेडफोन तसेच प्रश्न विचारण्यासाठी सुविधा उपलब्ध आहेत.या डिजिटल अत्याधुनिक डिजीटल क्लासरूमचे औपचारिक उद्घाटन लवकरच केले जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. बहुतांश प्राथमिक शाळा या कौलारूच आहेत. मात्र या डिजीटल क्लासरूमला पावसापासून बाहेरच्या बदलत्या वातावरणापासून संरक्षण मिळावे यासाठी प्लास्टिकच्या आच्छादन करून हे आयडियल सेंटर सज्ज करण्यात आला आहे. मात्र या डिजीटल क्लासरूममध्ये फॅनची सुविधा असली तरी एअर कंडिशन म्हणजेच ए.सी.ची कमतरता आहे. यासाठी मुलांच्या शैक्षणिक सुविधांना मदत करण्याचे सामाजिक शैक्षणिक बांधिलकीतून ए.सी. साठी डोनर मिळाल्यास या क्लासरूमसाठी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेली ए.सी.ची गरज उपलब्धता झाल्यास या डिजीटल क्लासरूम आयडियल सेंटर परिपूर्ण होणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल क्लासरूमच्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काय परिणाम होऊ शकतो, याबाबत आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. कमेंटसाठी क्लिक कर