सावंतवाडी : ज्या गावातील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, वृक्षतोड थांबवण्यासाठी न्यायालयाने स्वतः प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ नेमला आहे, त्याच गावाला उद्ध्वस्त करणाऱ्या महामार्गाची जनसुनावणी घ्यायला आज तेच प्रांताधिकारी येतात, हे या लोकशाहीतील सर्वात मोठे हास्यचित्र आहे.
असनिये गावची जैवविविधता येथील बारमाही वाहणारे नैसर्गिक झरे आणि संस्कृती वाचवण्यासाठी आम्ही गेली १५ वर्षे न्यायालयीन लढा दिला. त्यामुळे कोणाचीही मागणी नसलेला शक्तीपीठ महामार्ग आम्ही कोणत्याही परिस्थितीत गावातून जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत असनिये येथील ग्रामस्थांनी आणि पर्यावरणवाद्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले.
असनिये येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत ‘शक्तीपीठ महामार्गा’ संदर्भातील पर्यावरण जनसुनावणी प्रांताधिकारी वीरसिंग वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएसआरडीसीचे अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी आणि १०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
सुरुवातीपासूनच ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी जनसुनावणीच्या कायदेशीर वैधतेवरच बोट ठेवले. जनसुनावणीत स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत व इतर गावकऱ्यांनी असनिये गावच्या नैसर्गिक वैशिष्ट्यांचे विदारक चित्र मांडले.
संपूर्ण असनिये गावात एकही मानवनिर्मित विहीर नाही. गावची संपूर्ण शेती, बागायत आणि पिण्याचे पाणी हे डोंगरकपारीतून गुरुत्वाकर्षणावर आधारित वाहणाऱ्या ५५ नैसर्गिक झऱ्यांवर अवलंबून आहे. महामार्गाच्या उत्खननामुळे हे जमिनीखालील पाण्याचे जलस्त्रोत कायमचे नष्ट होतील.
गावात कोणालाही विषारी साप चावला साप चावला, तर येथील एका विशिष्ट झऱ्याचे ‘तीर्थ’ दिले जाते, ज्यामुळे व्यक्तीचा जीव वाचतो. गेल्या साडेतीनशे वर्षांत या गावात सर्पदंशाने एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, अशी अधिकृत नोंद आहे. या औषधी गुणधर्म असलेल्या पाण्याच्या स्त्रोतावर बुलडोझर फिरवणार का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.
सुनावणीदरम्यान काही ग्रामस्थांनी काही बड्या आमदारांनी आणि राजकीय नेत्यांनी या महामार्गाच्या प्रस्तावित मार्गावर आधीच मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. हा महामार्ग जनतेसाठी नसून त्या राजकारण्यांचे खिसे भरण्यासाठी आहे का ? असा सवाल केले.











