
मुंबई : महाप्रीतच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा सुविधा निर्माण करण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी मंत्रालयात बैठक घेऊन प्रकल्पाचा आढावा घेतला.
सिंधुदुर्ग हा पावसाळी जिल्हा असल्याने येथील हवामानाचा सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अभ्यास करून, त्यानुसार तांत्रिक नियोजन आणि प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.
बैठकीस मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.












