कुडाळ : कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडू आणि नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. हे कोर्ट खेळाडूंसाठी तात्काळ खुले करण्यात यावे, अशी आक्रमक मागणी नगरसेवक मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत क्रीडा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडूंना हक्काचे क्रीडांगण मिळावे यासाठी माजी आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नातून शासकीय निधीतून हे अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट मंजूर व तयार करण्यात आले होते. मात्र, अत्यंत खेदाची बाब म्हणजे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून या बॅडमिंटन कोर्टाचा वापर केवळ ईव्हीएम (EVM) मशीन ठेवण्यासाठी केला जात आहे.निवडणुकांचा संपूर्ण मोठा कालावधी उलटून गेला तरीही या क्रीडा संकुलातून ईव्हीएम मशीन अद्याप हटवण्यात आलेल्या नाहीत.
परिणामी, हे सुसज्ज बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून खेळाडूंसाठी पूर्णपणे बंद अवस्थेत असून तिथे धूळ साचली आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही स्थानिक खेळाडूंना सरावासाठी जागा मिळत नसल्याने खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी आहे.
युवासेनेच्या प्रमुख मागण्या:
१. क्रीडा कोर्ट रिकामे करणे: बॅडमिंटन कोर्टमध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीन तात्काळ इतर शासकीय गोदामात किंवा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात याव्यात.
२. १. खेळाडूंसाठी खुले करणे: सदर बॅडमिंटन कोर्टची आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता करून ते कुडाळ शहरवासीय व खेळाडूंसाठी त्वरित खुले करावे.
३.नियमित देखभाल: या क्रीडा संकुलाची नियमित देखभाल करण्यासाठी योग्य यंत्रणा उभारण्यात यावी.शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी ज्या कारणासाठी मंजूर झाला होता, त्याच कारणासाठी त्याचा वापर व्हावा हीच कुडाळवासीयांची प्रामाणिक इच्छा आहे.
क्रीडाप्रेमींच्या भविष्याचा विचार करून क्रीडा अधिकाऱ्यांनी या विषयात स्वतः लक्ष घालावे आणि हे कोर्ट लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा युवासेना यावर पुढील पाऊल उचलेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी नगरसेवक मंदार शिरसाठ, नगरसेवक संतोष शिरसाठ,पंचायत समिती सदस्य योगेश धुरी,गुरु गडकर, संदीप म्हाडेश्वर, शैलेश काळप,अमित राणे उपस्थित होते





