गायीला ‘राष्ट्रमाता’ घोषित करण्यात यावे, गोहत्या बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी आणि गायींच्या पालनपोषणासाठी सर्व शेतकऱ्यांना अनुदान योजना लागू करावी, अशा प्रमुख मागण्यांसाठी ‘गो सन्मान अभियानां’तर्गत वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना आज निवेदन देण्यात आले.गोपालनासाठी स्वतंत्र केंद्रीय गोसेवा मंत्रालय स्थापित करावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही यावेळी करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडेही पाठवण्यात आल्या आहेत.उपस्थितांनी गायीचे धार्मिक, पर्यावरणीय, आरोग्यदायी, नैसर्गिक शेती, सांस्कृतिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी गायींच्या संगोपनासाठी आर्थिक मदत देणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत शासनाने यासंदर्भात तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.यावेळी सभापती सिद्धेश रावराणे, माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा संसारे, गोप्रचारक गव्यसिद्ध श्री महेश संसारे, भाजपा कार्यकर्ते अनंत फोंडके, जयवंत पळसुले, परब सर, प्रफुल्ल पवार, निलय शेरे, प्रफुल्ल रावराणे आदी उपस्थित होते.












