कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठी दुर्घटना टळली; रुग्ण तपासणी कक्षाचे छत कोसळले!

कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तपासणी कक्षामधील छताचा काही भाग शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी उपस्थित असलेले रुग्ण व कर्मचारी थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सुमारे पन्नास वर्षे जुनी असलेल्या या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, तिची तातडीने दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करण्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा करून तसेच बांधकाम विभागाला सूचना देऊनही आवश्यक दुरुस्ती करण्यात दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे. यामुळे रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी शुक्रवारी आरोग्य सचिव ई. रवींद्र तसेच जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती. पाहणीनंतर इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक निर्देशही देण्यात आले होते. मात्र त्यानंतर लगेचच छताचा भाग कोसळल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या घटनेनंतर जीर्ण इमारत तातडीने पाडून त्या ठिकाणी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन रुग्णालय इमारत उभारण्याची मागणी नागरिक, व रुग्णांकडून जोर धरू लागली आहे. एखाद्या कर्मचारी किंवा रुग्णाचा जीव गेल्यानंतरच बांधकाम विभाग जाग घेणार का, असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित भाग बंद करून पुढील कार्यवाही सुरू केली असून, इमारतीच्या सुरक्षिततेची तातडीने तपासणी करून आवश्यक निर्णय घेण्याची मागणी होत आहे.