सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकर
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सन्मान केला जाणार आहे. कणकवली येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय, कसाल येथे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यात इयत्ता दहावीमध्ये ९० टक्के व त्यापेक्षा अधिक, बारावीमध्ये ८० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच यूपीएससी, एमपीएससी उत्तीर्ण, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
याशिवाय नुकतेच नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेल्या समाजबांधवांचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
गुणगौरवासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज संबंधित पदाधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाने सर्व समाजबांधवांनी या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन केले आहे.












