गो मातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून मान्यता मिळावी आणि तिचे संरक्षण, संवर्धन व्हावे, या मागणीसाठी ‘गो सन्मान आव्हान अभियाना’अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील गोपालक व गोप्रेमींनी आज सोमवारी तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन सादर केले. आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी विनंती यावेळी करण्यात आली.या अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना बाबुराव खवणेकर म्हणाले, “भारतभूमी ऋषी-मुनी, संत आणि धर्मसंस्कृतीची भूमी आहे. वेद, उपनिषद, पुराणे, रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेत गोमातेचे अत्यंत उच्च स्थान वर्णन केले आहे. ऋग्वेदात गायीला ‘अघ्न्या’ म्हणजे जिला मारणे पाप आहे, असे म्हटले आहे. ज्या प्रकारे वाघ राष्ट्रीय प्राणी आणि मोर राष्ट्रीय पक्षी आहे, त्याचप्रमाणे भारताच्या संस्कृतीचे जिवंत प्रतीक असलेल्या गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करणे ही काळाची गरज आहे”. 27 एप्रिल 2026 रोजी भारतातील 5000 तहसील कार्यालयांवर स्वाक्षरी मोहीम आणि निवेदन सादर करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. हे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.खवणेकर यांनी पुढे सांगितले की, भगवान श्रीकृष्ण स्वतः ‘गोपाल’, ‘गोविंद’ म्हणून ओळखले जातात. श्रीरामांच्या अयोध्येत गोसंरक्षण हा राजधर्माचा भाग होता. भगवान शिवांच्या परिवारात धर्माचे स्वरूप असणारे नंदी महाराज आहेत. संत तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज यांनी गोसेवा ही ईश्वरसेवा मानली. छत्रपती शिवाजी महाराजांनीही गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून गोसंरक्षणाला राजधर्माचे स्वरूप दिले.गोमाता ही केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नसून भारतीय अर्थव्यवस्था, शेती, आरोग्य आणि पर्यावरणाचा आधारस्तंभ आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक खत, औषधी उपयोग, दुग्धव्यवस्था यांचा केंद्रबिंदू गोमाता आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी बाबुराव खवणेकर, गिरीश फाटक, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, दिना आचार्य, गौरी मराठे, नितीन लिंगोजी, प्रज्वल कोयंडे, अभी वेंगुर्लेकर, कीर्तीमंगल भगत, विलास पालव, यशवंत कुडपकर, विद्या सावळ, सुनील खानोलकर, ॲड. प्रकाश बोवलेकर, शिवदत्त सावंत, सुनील वारंग, सागर राणे, श्यामसुंदर राय, दिलीप परब, सचिन होडावडेकर, शरद परब, ओजस परब, हर्षद आरोलकर, सोहम गरगटे, प्रशांत सावंत, देवदत्त गोखले, अवधूत मराठे, संतोष सावंत, प्रदीप सावंत, बिपिन वरसकर, दिलीप करंगुटकर यांच्यासह मोठ्या संख्येने गोप्रेमी उपस्थित होते.












