सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे. नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे. लग्न कार्यातील मत्वाचा विधी म्हणजे पुण्यवचन. स्वतःच्या पुण्यवाचनाच्या या विधीत मुंडावळे बांधून निलेश गावकर बसलेले असतानाच एक शेतकरी आजारी बकऱ्याला उपचारासाठी घेऊन त्यांच्या घरी आला. त्या वेळी पुण्यवचन सुरू असूनही त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ उठून त्या बकऱ्याची तपासणी केली आणि आवश्यक उपचार केले. शेतकऱ्याच्या अडचणीची जाणीव ठेवत त्यांनी आपला वैयक्तिक कार्यक्रम बाजूला ठेवून सेवेला प्राधान्य दिले. हरकुळ येथील पशुसंवर्धन विद्यालयात पदविका घेतलेले आणि शिरवंडे दशक्रोशीमध्ये पशुसेवा देणारे, शिरवंडे, तालुका मालवण गावचे सुपुत्र पशुसेवक निलेश मधुकर गांवकर यांचे समाजाच्या सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे. पशुधन हे शेतकऱ्यांचे मोठे आधारस्तंभ असल्याने अशा वेळी तत्पर सेवा देणारे पशुसेवक समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत.












