मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री मा. श्री. शंभूराजे देसाई यांची मुंबईतील मेघदूत निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीदरम्यान सिंधुदुर्गातील पर्यटन विकासाच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात नव्या पर्यटन सुविधा निर्माण करणे, विद्यमान पर्यटनस्थळांचा विकास करणे तसेच पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषय मांडण्यात आले.
सिंधुदुर्ग हा निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे, किल्ले, जलक्रीडा आणि कोकणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यावरही या चर्चेत भर देण्यात आला.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध पर्यटनविषयक प्रलंबित प्रश्न आणि आवश्यक सुविधांबाबतही पर्यटनमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. या विषयांवर सकारात्मक पद्धतीने पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीला माजी मंत्री तथा आमदार श्री. दीपकजी केसरकर यांचीही उपस्थिती होती.
सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आता या चर्चेचे रूपांतर प्रत्यक्ष कामांमध्ये कसे होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.












