महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोईर यांच्या समवेत बैठक संपन्न
संजय पेटकर / कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबईतील केईएम, टाटा, वाडिया, महात्मा गांधी मेमोरियल, कामा, ग्लोबल यांसारख्या प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात. उपचारासाठी रुग्णालयात अनेक दिवस राहावे लागत असल्याने रुग्णांसोबत आलेल्या गरीब व गरजू नातेवाईकांसमोर निवासाचा गंभीर प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात ‘आरोग्य कॉरिडॉर (Health Corridor) विकसित करून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरक्षित, स्वच्छ, सुसज्ज आणि अत्यल्प दरातील निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मा. श्री. प्रमोद जठार यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री मा. डॉ. पंकज राजेश भोईर साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुंबईत उपचारासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना परवडणारी निवासव्यवस्था उपलब्ध नसल्याने रुग्णाचे नातेवाईकांवर फुटपाथ, रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर राहण्याची वेळ येते. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे जठार यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
‘आरोग्य कॉरिडॉर’च्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना आधार
प्रमुख रुग्णालयांच्या परिसरात उपलब्ध शासकीय अथवा योग्य जागांचा वापर करून धर्मशाळा, डॉरमेटरी किंवा अल्पदरातील निवास केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव या मागणीत मांडण्यात आला आहे. यामुळे उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या हजारो गरीब व गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावर किंवा उघड्यावर राहण्याची वेळ येणार नाही.
या योजनेसाठी DCPR 2034 मधील उपलब्ध तरतुदींचा प्रभावी वापर करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अतिरिक्त FSI अथवा प्रीमियममध्ये सवलत, मालमत्ता करातील सवलत तसेच Development Rights हस्तांतरणासारख्या प्रोत्साहनात्मक तरतुदींचा वापर करून खासगी विकासक आणि धर्मादाय संस्थांचा सहभाग वाढविण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. तसेच DCPR 2034 मधील Reg. 33(2)अंतर्गत उपलब्ध तरतुदींचा प्रोत्साहनात्मक वापर करून धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून अशा सुविधा उभारण्याची शक्यता तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळते; मात्र त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांच्या निवासाचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. त्यामुळे ‘आरोग्य कॉरिडॉर’ ही केवळ निवासाची योजना नसून गरजू कुटुंबांना आधार देणारी मानवतावादी संकल्पना असल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्र्यांकडे स्पष्ट केली.
यावेळी या बैठकीस प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई, उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), मा. महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA), मा. मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ, मा. मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मा. उपआयुक्त (आरोग्य), बृहन्मुंबई महानगरपालिका आदी उपस्थित होते.












