सिंधुदुर्ग : जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर आणि ओव्हरलोड खडी वाहतुकीविरोधात सामाजिक कार्यकर्ते शामसुंदर धुरी यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि संबंधित प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतून खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, काही वाहनांकडून नियमांचे उल्लंघन तसेच क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महसूल आणि रस्ते प्रशासनाचे नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर खडी वाहतुकीसाठी शासनाच्या जीआरनुसार नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, वाहनांच्या वाहतुकीच्या वेळेचे पालन करावे, तसेच प्रत्येक डंपरला ताडपत्री बंधनकारक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्येक वाहनाचे ग्रॉस वेट तपासून क्षमतेनुसारच वाहतूक करण्याची अंमलबजावणी करावी. गोव्याहून येणाऱ्या किंवा गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महाराष्ट्र परमिटची तपासणी करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
खडी वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाकडे वैध रॉयल्टी पास आहे की नाही, याची कडक तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन बेकायदेशीर आणि ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन संबंधित वाहनांची तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












