इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील ३ गाळ्यांवर पालिकेचा ‘सील’!; तक्रारीनंतर प्रशासनाची कारवाई

सावंतवाडी : लाभधारका ऐवजी अन्य व्यक्ती गाळे करत असल्याचा ठपका ठेवून सावंतवाडी पालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील तीन गाळे पालिका प्रशासनाकडून “सील” करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पालिकेचे कर विभागाचे अधिकारी गोविंद गवंडे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या गाळेधारकांना हे गाळे मंजूर झाले होते त्यांच्या ऐवजी अन्य व्यक्ती हे गाळे वापरत होते. याबाबतची तक्रार झाल्यानंतर आम्ही तपासणी केली. यावेळी जे गाळेधारक आहेत त्यांच्या ऐवजी अन्य व्यक्तीचे गाळे वापरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आम्ही गाळे २४ तासात खाली करा, अशी नोटीस दिली. परंतु त्यांच्याकडून कोणतीही भूमिका घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही थेट गाळे सील केले आहे. त्यात संबंधितांच्या जीवनावश्यक वस्तू आहेत. त्याबाबतचा निर्णय मुख्याधिकारी घेणार आहेत.
दरम्यान याबाबतची माहिती श्री. मुंज यांनी दिली. ते म्हणाले, आपल्या अनेक मागण्या आहेत. परंतु पालिका प्रशासनाकडून वरवरची कारवाई करण्यात आली आहे. संबंधितांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही. चुकीच्या पद्धतीने गोळ्यांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आपण १५ ऑगस्ट ला उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र पालिकेने कारवाई केलेली आपल्याला मान्य नाही. त्यामुळे आपण उपोषणाला बसण्यावर ठाम आहोत.