क्षयरोग जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची आघाडी; कळसुळकर हायस्कूलमध्ये अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सावंतवाडी : येथील कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे सावंतवाडी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी अभिजीत तिळवे यांच्या मार्गदर्शन व निरीक्षणाखाली क्षयरोग जनजागृती अभियान अत्यंत उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख उत्तम पाटील, ५८ महाराष्ट्र एनसीसी बटालियन ओरोसचे फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस तसेच प्रशालेतील सर्व एनसीसी कॅडेट्स प्रमुख उपस्थित होते.
या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांना क्षयरोगाची प्रमुख लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, वेळेवर निदान आणि योग्य उपचाराचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच समाजात क्षयरोगाबाबत पसरलेले गैरसमज दूर करून अचूक माहिती पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्ससह सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘क्षयरोगमुक्त समाजासाठी जनजागृती’चा संकल्प केला.
यावेळी उपस्थित सर्व एनसीसी विद्यार्थ्यांना ‘माय भारत’ पोर्टलवर ‘Youth Volunteer’ म्हणून आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी अधिकृत संकेतस्थळावर (mybharat.gov.in) त्वरित नोंदणी पूर्ण करून युवक स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी माहिती देण्यात आली.