मोहरम, जयंती आणि आंदोलने पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मनाई आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहण्यासाठी १० जून रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २४ जून रोजी २४ वाजेपर्यंतच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात १७ ते २६ जूनपर्यंत मोहरम मासारंभ, १७ जून रोजी महाराणा प्रताप जयंती (तिथीप्रमाणे), १७ जूनला राजमाता जिजाऊ स्मृतिदिन (तारखेप्रमाणे) असे सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यापूर्वी राज्यात उत्सव कालावधीत जातीय घटना घडलेल्या असून त्याचे पडसाद उमटून विविध राजकीय पक्ष व संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आगामी काळात त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटून जातीय तणाव निर्माण होण्याची नाकारता येत नाही. सध्या राज्यात शक्तिपीठ महामार्ग, आंबा व काजू शेतकरी संघटना व इतर मुद्यांवरुन जिल्ह्यातील विधिध संघटनांकडून निवेदन, निषेध आंदोलन करण्यात येत आहे. मराठा व ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या मुद्यावरुन उपोषण, आंदोलने होत आहेत. तसेच सोशल मीडियावर समाजकंटकांकडून धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट प्रसारित करून विविध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत.
जिल्ह्यातील आंबा, काजू शक्तिपीठ महामार्ग व विविध समाजांचा आरक्षण मुद्दा व आगामी सण, उत्सव या अनुषंगाने जिल्ह्यात होणारे कार्यक्रम, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आक्षेपार्ह पोस्ट, जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चा, संप, निदर्शन, रास्ता रोको आदींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नयेत. जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, यासाठी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे.