कणकवली : शहरातील डीएसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले. या गृहनिर्माण प्रकल्पातील ३० मीटर अदानी कंपनीच्या कर्मचान्यांनी ग्राहकांना कल्पना न देता अचानक परस्पर बदलले. दरम्यान, ही बाब तेथील वीज ग्राहकांनी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण यांना सांगितली. त्यानंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी कंपनीचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. नागरिकांच्या एकजुटीमुळे काढून टाकण्यात आलेले जुने तीस पारंपरिक मीटर पुन्हा पूर्ववत बसविण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना भाग पाडण्यात आले.
यावेळी कलमठ ग्रा. पं. सदस्य अनुप वारंग, पपु यादव, नितीन पवार, श्रेयश चिंदरकर, सचिन खोचरे, यांच्यासह डीएसपी गार्डनमधील नागरिक, अदानी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी आणि वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.
महावितरण कंपनीकडून नेमलेल्या अदानी कंपनीच्या अधिकारी व कर्मचान्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू असताना अनेक ग्राहकांना याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नव्हती. तसेच स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज बिलात वाढ होण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी आणि ग्राहकांच्या हिताचे प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी स्मार्ट मीटरला विरोध दर्शविला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. अखेर नागरिकांच्या दबावामुळे काढून ठेवलेले सुमारे तीस जुने मीटर पुन्हा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेत, ग्राहकांच्या संमतीशिवाय आणि योग्य जनजागृती न करता, कोणत्याही प्रकारचे स्मार्ट मीटर बसवू देणार नसल्याचा इशारा संदीप मेस्त्री यांनी दिला. तसेच शासन व वीज वितरण कंपनीने प्रथम नागरिकांच्या शंका दूर कराव्यात, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात चार हजार ग्राहकांचे स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. हे मीटर बसवताना ग्राहकांचा अर्ज घेतला आहे का? असा सवाल मेघा गांगण यांनी विचारला. तर ग्राहकांच्या संमतीशिवाय कणकवली शहरात स्मार्ट मीटर लावू नका, असे भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी सांगितले.












