⚡ देवगडला हरित ऊर्जेचे केंद्र बनवा; सौर-पवन प्रकल्पांसाठी शासनाकडे मागणी

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात देवगड तालुका हा सौर ऊर्जा निर्मितीसाठी पोषक भौगोलिक क्षेत्र असून, येथील मोकळ्या जागांचा व सूर्यप्रकाशाचा प्रभावी वापर करून मोठ्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतात, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच विद्यमान पवन ऊर्जा प्रकल्पांबरोबरच संकरित (पवन सौर) ऊर्जा प्रकल्प उभारल्यास हरित ऊर्जा निर्मितीत मोठी वाढ होऊन राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला बळकटी मिळेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ग्रामीण भागाचा विकास होईल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. तसेच प्रकल्पाच्या उभारणी, देखभाल, संचालन व सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज भासणार असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हरित ऊर्जा क्षेत्रात देवगड तालुक्याला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी शासनाने या प्रकल्पाचा सकारात्मक विचार करून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे. “ग्रीन देवगड ऊर्जा संपन्न देवगड” हे ध्येय प्रत्यक्षात आणण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.