⚖️ ‘हा अपघात नाही, घातपातच!’ – सोनाली गावडे प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी । Kokanshahi ।

बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयित मृत्यूप्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असली तरी हा घातपातच असल्याचा ठाम संशय व्यक्त करत, या प्रकरणी न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी केली आहे. सोनाली गावडे ८ जुलैला सकाळी घरातून कामावर जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती कंपनीत पोहोचलीच नाही आणि संध्याकाळी घरीही न परतल्याने बांदा पोलिसांत ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या पाटात अवघ्या एक फूट पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. अवघ्या एक फूट पाण्यात बुडून मृत्यू होणे अत्यंत संशयास्पद असल्याने, सोनालीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठीच मृतदेह पाण्यात टाकल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, तसेच कुटुंबीयांचे पुनश्च जबाब नोंदवून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कुटुंबीयांचे पुन्हा जबाब नोंदवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.