देवगडात पवन ऊर्जा प्रकल्पासोबत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी; निनाद देशपांडे यांचे पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्प परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नुकतेच दिलेल्या या निवेदनात देवगड तालुका हा अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत पोषक भौगोलिक क्षेत्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पवन ऊर्जा प्रकल्प परिसरातील मोठ्या प्रमाणातील मोकळ्या जागेचा प्रभावी वापर करून सुमारे ४ ते ५ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो, असे देशपांडे यांनी म्हटले आहे. तसेच विद्यमान पवन ऊर्जा प्रकल्पासोबत सौर ऊर्जा प्रकल्पाची सांगड घालून ‘हायब्रिड ऊर्जा प्रकल्प’ विकसित केल्यास वर्षभर सातत्यपूर्ण व कार्यक्षम वीज निर्मिती होईल. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हरित ऊर्जेच्या क्षेत्रात राज्यासाठी आदर्श ठरू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक वीज गरजा पूर्ण होण्यास मदत होण्याबरोबरच सुमारे २०० स्थानिक युवक-युवतींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून ग्रामीण भागातील रोजगार वाढेल आणि युवकांचे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, देवगड तालुक्यात निर्माण होणाऱ्या हरित विजेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि उद्योगांना वीज दरामध्ये विशेष सवलत अथवा प्रोत्साहनपर योजना लागू करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

“ग्रीन देवगड – ऊर्जा स्वयंपूर्ण देवगड” हे ध्येय साकार करण्यासाठी पवन आणि सौर ऊर्जेचा हायब्रिड प्रकल्प उभारण्याबाबत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी विनंती निनाद देशपांडे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे.