वेंगुर्ले : शासनाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार वेंगुर्ले नगरपालिकेने क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानगाळ्यांची अनामत रक्कम व भाडेवाढ करण्यासाठी दुकान मालकांना नोटीसा जारी केल्या आहेत. ही भाडेवाढ वेंगुर्ल्यासारख्या छोट्या शहरातील व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असून ती तत्काळ स्थगित करण्यात यावी, तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुपुर्द केले.
निवेदनात म्हटले आहे की, माझ्या सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये ४८ दुकानगाळे आहेत. या दुकानगाळ्यांमध्ये गेली अनेक वर्षे व्यापारी आपला व्यवसाय करीत आहेत. सध्याच्या ऑनलाईन खरेदी सुविधांमुळे स्थानिक व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. बाहेरील फिरते व्यापारी येऊन गरजेच्या वस्तू परस्पर विक्री करून जात असल्याने नगरपरिषदेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना गिन्हाईक उपलब्ध होत नाही. याचा परिणाम मार्केटमधील दुकानांवर होऊन मार्केटमधील दुकानदारांची परिस्थिती बिकट झालेली आहे.
वेंगुर्ले नगरपरिषदेने १ एप्रिल, २०२६ पासून दुकानगाळ्यांची अनामत रक्कम दुप्पट करून गाळ्यांचे भाडेही दुप्पट केले आहे. सदरच्या व्यापारीवर्गाला भाडे देणे परवडत नसल्याचे दिसून येत आहे. तशी तक्रार संबंधित व्यापाऱ्यांनी आपल्याकडे केलेली आहे. याविषयी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित भाडेकरूंना सुधारित भाडेवाढ व अनामत रक्कम जमा करण्याची नोटीस दिली आहे. सदरची दरवाढ अन्यायकारक असल्याचे संबंधित व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. या दरवाढीला आपल्या स्तरावरून तात्काळ स्थगिती देण्यात यावी. आपल्या स्तरावर संबंधित यंत्रणेतील घटक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व इतर अधिकारी वर्गासमवेत आपल्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करावी. बैठकीला मलाही निमंत्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.












