कणकवली : फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीला एलसीबीच्या पथकाने भिवंडी, ठाणे, नेरूळ आदी भागांतून अटक केली. टोळीतील तीन आरोपींना अटक करून एलसीबीचे पथक शनिवारी सकाळच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले.
जगदीश श्रीराम यादव – वय २५, भिवंडी, चनाप्पा साईबाणा कांबळे – वय ५०, ठाणे, नागेश हनुमत माने – वय ४१, नेरूळ, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तिघांनाही शनिवारी दुपारनंतर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही घटना फोंडा गाडी येथे ३० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तृप्ती लिंग्रस व त्यांची आई या दोघी घरी होत्या तर तृप्ती यांचे भाऊ मॉर्निंगवॉकला गेले होते. त्याचवेळी तीन इसम जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसले.
त्यांनी तृप्ती व तिच्या आईच्या अंगावरील दागिने पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघींनीही आरडाओरड केल्यानंतर तिन्ही चोरटे साहित्य तिथेच टाकून पसार झाले होते. याबाबत तृप्ती यांच्या फिर्यादीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.
याबाबत कणकवली व एलसीबी पोलीस दोघांचाही समांतर तपास सुरू होता. संशयितांचा ठावठिकाणा लागल्यानंतर एलसीबीची टीमचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाली. एलसीबीच्या पथकाने तिन्ही संशयितांना शोध घेत त्यांच्या मुसक्या आवळल्या. कोकणशाही कणकवली












