सावंतवाडीच्या डॉ. विलास गावडेंना ‘निसर्गोपचार गौरव सन्मान 2026’

निसर्गोपचार गौरव सन्मान 2026

सावंतवाडीचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ. विलास मोहन गावडे यांच्या निसर्गोपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा ‘निसर्गोपचार गौरव सन्मान 2026’ प्रदान करण्यात आला आहे.

बुलडाणा येथील भातृमंडळ हॉलमध्ये रविवार, 4 ऑक्टोबर 2026 रोजी हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, ए.जी.एम.ए. तसेच योगा निसर्गोपचार चिकित्सक असोसिएशन यांच्या माध्यमातून हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.

निसर्गोपचार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तज्ञांचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला महाराष्ट्रातील शेकडो निसर्गोपचार तज्ञांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला बुलडाणा मतदारसंघाचे आमदार संजयभाऊ गायकवाड, बुलडाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. पूजा गायकवाड, तसेच डॉ. सचिन सुपे, डॉ. त्रिदीप गुहा, प्रा. डॉ. प्रशांत कपले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर तसेच एमजीएम विद्यापीठाच्या योगा विभागाचे प्रमुख श्री. गंगाप्रसाद खरात यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

मंचावर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्री. नितीनराजे पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबुराव कानडे यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

सावंतवाडी परिसरात निसर्गोपचाराच्या माध्यमातून आरोग्यसेवा देत समाजासाठी योगदान देणाऱ्या डॉ. विलास मोहन गावडे यांच्या कार्याचा या सन्मानामुळे विशेष गौरव झाला आहे.

‘निसर्गोपचार गौरव सन्मान 2026’ मिळाल्यानंतर डॉ. विलास गावडे यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

निसर्गोपचार क्षेत्रातील कार्याची राष्ट्रीय पातळीवरील दखल मिळाल्याने सावंतवाडी आणि आसोली गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कोकणशाहीकडून डॉ. विलास मोहन गावडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!