नारळी पौर्णिमेचा जल्लोष! नारळांचा टणत्कार अन् बक्षिसांचा वर्षाव! मालवणात भव्य स्पर्धेची घोषणा

मालवण : नारळी पौर्णिमेच्या औचित्यावर मालवण बंदर जेटी या ठिकाणी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व संस्कृती जपण्यासाठी ‘मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, मालवण’तर्फे भव्य ‘महिला नारळ लढवणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाचे यंदा ११ वे वर्ष असून २७ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता मालवण बंदर जेटी हा सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे अशी माहिती मालवणी संस्कृती व वारसा मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल राजभोग येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी या स्पर्धेतील भव्य बक्षीसांचे अधिकृत सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी सदस्य देवानंद लुडबे, शुभदा पाडगावकर, रेश्मा खंदारे-नागवेकर, आर्या मुणगेकर, कोळंब सरपंच सिया धुरी, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, स्नेहल मेथर, मंडळाच्या सल्लागार वकील अमृता मोंडकर, रुद्राक्ष कांदळकर, अवनीश मेथर यांसह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी संघाच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर लगेचच या स्पर्धेला सुरुवात होईल. कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील नामवंत नृत्य कलाकारांचे ‘कोळी नृत्य’ सादरीकरण आणि प्रसिद्ध जादूगार निखिल यांचा ‘जादूचा शो’ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर पाहुणे उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. यात प्रथम क्रमांक फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, १० लाखांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट, द्वितीय क्रमांक मिक्सर, पैठणी, सोन्याची नथ, १० लाखांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट, तृतीय क्रमांक कुकर, पैठणी, चांदीचे पैंजण आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट, चतुर्थ क्रमांक गॅस शेगडी, पैठणी, चांदीचे पैंजण आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट. या स्पर्धेत लागोपाठ किंवा सलग तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिला स्पर्धकास मंडळाच्या वतीने ९ ग्रॅम सोन्याचा हार देऊन विशेष सन्मानित करण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना मंडळाकडून नारळ मोफत दिले जातील. स्पर्धा पाहण्यासाठी येणाऱ्या महिला-भगिनींना सामाजिक संदेश असलेली कूपन्स दिली जातील. त्याद्वारे ‘लकी ड्रॉ’ काढून आकर्षक बक्षीसे दिली जातील. सहभागी सर्व महिलांना ‘आर्या हेल्थ क्लब’तर्फे तीन दिवसांची ऑनलाइन फ्री ट्रायल व मोफत आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणार आहे. आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या स्वरूपात साकारत आहे. तरी यंदाही सर्व महिला-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी,” असे आवाहन श्री. मोंडकर यांनी केले आहे.