पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडी : तालुक्यातील देवसू मधलीवाडी येथे ओरोस पोलीस कॉलनीत राहणारे पोलीस कर्मचारी प्रदीप शांताराम नाईक यांच्या बंद घराचे खिडकीचे ग्रिल तोडून अज्ञात चोराने १४,६०० रुपयांचे साहित्य लांबवल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने नाईक यांच्या घरासह त्यांच्या चुलत भावाचेही घर लक्ष्य करत दोन्ही ठिकाणी चोरी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, १८ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान नाईक यांच्या घर क्रमांक २०८ च्या खिडकीचे ग्रिल तोडून चोराने आत प्रवेश केला. घरातील बेडरूम, किचन व पडवीतून तांब्याची कळशी, मोठा हंडा, तामण, पितळी समई, परात, गॅस बर्नर, चांदीचा करंडा आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. तसेच शेजारी असलेल्या चुलत भावाच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून आत चोरी केली.
याप्रकरणी प्रदीप नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.