शाळेचा माजी विद्यार्थीच बनला विद्यार्थिनींचा ‘पॅडमॅन’; मोफत सॅनिटरी पॅडची अनोखी भेट!

अहिल्यानगर : देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालय, कर्जुने खारे येथे कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि Höganäs India Pvt. Ltd. यांच्या CSR सहकार्याने “स्वास्थ्य सखी – Women Hygiene Awareness and Health Program” हा महिला आरोग्य जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सुमारे १५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

विशेष बाब म्हणजे, कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थिनींच्या आरोग्याची गरज ओळखून सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन ( Sanitary Pad Vending Machine ), वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन ( Sanitary Pad Incinerator ) तसेच सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. त्यामुळे परिसरात त्यांची “विद्यार्थिनींसाठी पॅडमॅन” अशी ओळख निर्माण झाली आहे.

कार्यक्रमात सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी सौ. छायाताई निमसे आणि डॉ. पल्लवी जाधव यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत वैज्ञानिक माहिती दिली. मासिक पाळी ही स्त्रीच्या शरीरातील नैसर्गिक जैविक प्रक्रिया असून त्याबाबत असलेले अंधविश्वास, गैरसमज आणि लाज-भीती दूर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. योग्य स्वच्छता, संतुलित आहार, नियमित सॅनिटरी पॅडचा वापर आणि आरोग्याची काळजी याबाबत त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. तसेच शाळेला सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅडची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यासाठी सॅनिटरी पॅड डिस्पोजल भेट देण्यात आली. या सुविधेमुळे विद्यार्थिनींना शाळेतच आवश्यकतेनुसार सॅनिटरी पॅड सहज उपलब्ध होणार असून वापरलेल्या पॅडची स्वच्छ व वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी मुख्याध्यापक गोडे सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ” आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी प्रशांत पाटील शेळके यांनी आपल्या शाळेतील मुलींसाठी इतका महत्त्वाचा आणि उपयुक्त उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. त्यांचा आम्हाला विशेष अभिमान वाटतो. कृष्णप्रित वेलफेअर फाऊंडेशन, कृष्णाली फाऊंडेशन आणि Höganäs India Pvt. Ltd. यांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. “

कार्यक्रमाला उद्योजक संजय शिंदे, अकोलकर सर, कृष्णाली फाऊंडेशनचे खजिनदार अमर बोबडे, सदस्य सुनिल शेळके, सदस्य प्रियांका गायकवाड, आशा शेळके, आशासेविका निमसे, फलके, शेळके यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक गोडे सर, कोरडे मॅडम, बांदल मॅडम, सोनटक्के मॅडम, ढवळे मॅडम, चव्हाण मॅडम, कर्डिले सर, धेंडे सर, मिसाळ सर, राहुल गायकवाड आणि प्रशांत लांडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचे संचालक प्रशांत पाटील शेळके आणि संचालिका प्रियांका पाटील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमातून किशोरवयीन मुलींमध्ये महिला आरोग्य, मासिक पाळी स्वच्छता आणि सन्मानपूर्वक आरोग्य व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.