कणकवली : कोकणासह राज्यातील अनेक भागांत मान्सूनने अद्याप अपेक्षित गती घेतलेली नसल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचा पाऊस काहीसा लांबणीवर पडल्याची चर्चा असून, अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीची कामे पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पिकांच्या उगवणीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
कणकवली तालुक्यात सध्या दिवसातून एक-दोन हलक्या सरी पडत असल्या तरी सातत्यपूर्ण पाऊस होत नसल्याने शेतजमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. यंदा मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भात पेरणी केली. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने यंदा एल निनोचा प्रभाव जाणवण्याची शक्यता वर्तविली असून, त्याचा परिणाम मान्सूनच्या गतीवर होत असल्याचे बोलले जात आहे. जून महिना मध्यावर आला तरी जोरदार पावसाची सुरुवात झालेली नाही. मात्र, आगामी काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होऊन कोकणासह राज्यातील विविध भागांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असून, सर्वांच्या नजरा आता आगामी पावसाकडे लागल्या आहेत.
दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाता हवामान खात्याच्या सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. वेळेवर आणि समाधानकारक पाऊस झाल्यास खरीप हंगामाला मोठा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.












